पुणे : जिल्ह्यातील काही तालुक्यात उसावर हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे. जून आणि जुलैमध्ये पाऊस कमी पडल्याने हुमणीचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची भिती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. हुमणीला आळा घालण्यासाठी शेतकऱ्यांनी सामुहिक प्रयत्न सुरु केले आहेत. नारायणगाव परिसरातील रामवाडीचे ग्रामस्थ हुमणीचे भुंगेरे गोळा करण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे रामवाडीत हुमणीला आळा घालण्यात यश आले आहे.
कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे यांनी हुमणीला आळा घालण्यासाठी जैविक बुरशी वापरावी, असे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव मार्फत ऊस पिकावरील हुमणी किडीचे एकात्मिक कीड नियंत्रणावर प्रात्यक्षिक व कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी भरत टेमकर, दत्तात्रय येवले, शंकर भोर, सखाराम पिंगळे, किशोर भोर, किरण येवले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.