गुजरात: सौराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस, कच्छ जिल्ह्यात एका तासात २ इंच पावसाने नद्यांना उधाण

गुरुवारी गुजरातच्या बहुतांश भागात जोरदार पाऊस झाला. तर कच्छमध्ये दिवसभर झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. शहरात ठिकठिकाणी रस्ते नद्यांसारखे वाहत होते. कच्छसह जामनगर, जुनागढ, दाहोद, वलसाड आणि अरवल्ली जिल्ह्यातही जोरदार पाऊस कोसळला. आरवल्लीतील नद्यांना उधाण आल्याची स्थिती होती. या पावसाने आंबा पिक तसेच मुगाचे पिक खराब होण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.

भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कच्छमध्ये दुसऱ्या आठवड्यात सलग तीन दिवस पाऊस पडत आहे. याशिवाय वादळी वाऱ्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे वृत्त आहे. गुरुवारी दुपारी नखत्राणामध्ये धुवाँधार पाऊस कोसळला. एका तासात २ इंच पाऊस झाल्याची नोंद झाली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्या. भूज-लखपत रोडवरील वाहतूक ठप्प झाली. मांडवी तालुक्यातील नद्यांनाही उधाण आले. दरम्यान, मंगळवारी जुनागढ जिल्ह्यातील मनवादर तालुक्यातील एका गावातून वाहणाऱ्या नदीला अवकाळी पावसाने पूर आला. यादरम्यान १२ मजुरांना घेवून जाणारी ऑटो रिक्षा वाहून गेली. अग्निशमन दल आणि स्थानिकांनी नऊ लोकांना वाचवले. तर तीन महिलांचा बुडून मृत्यू झाला. पुढील सात ते आठ दिवस अहमदाबादसह राज्यात पाऊस सुरू राहिल. त्यामुळे मे महिन्यात राज्याचे कमाल तापमान २.० डिग्रीने कमी राहील अशी शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here