गुजरात : पावसाने कृषी क्षेत्रावर संकट, भात आणि ऊस पिकाला सर्वाधिक फटका

सुरत : मुसळधार पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नेत्यांनी दक्षिण गुजरातमधील सध्याच्या परिस्थितीचे वर्णन “लिलो दुकल” (ओला दुष्काळ) असे केले आहे. गेल्या चार महिन्यांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, काही भागात असेच वातावरण कायम राहण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याचा सर्वाधिक फटका दक्षिण गुजरातमध्ये घेतल्या जाणाऱ्या भात आणि ऊस या पिकांना बसला आहे.

सरकारी अंदाजानुसार, दक्षिण गुजरातमध्ये सुमारे १.८० लाख हेक्टरमध्ये भात आणि १.२० लाख हेक्टरमध्ये उसाचे पीक घेतले जाते. भाजीपाला, नगदी पिके आणि बाजरीच्या लागवडीवरही परिणाम झाला आहे. शेतकरी नेते जयेश पटेल म्हणाले, २२ जूनपासून सुरू झालेला पाऊस चार महिन्यांनंतरही सुरूच आहे. दक्षिण गुजरातमधील अनेक भागात पिकांचे नुकसान झाले असून तो ‘लिलो दुकला’सारखा आहे. पटेल यांच्या म्हणण्यानुसार सुमारे २०,००० हेक्टरमध्ये भाताचे पीक तयार झाले होते. परंतु सूरत, वलसाड, नवसारी, तापी, भरूच आणि डांगमध्ये पावसामुळे पीक उद्ध्वस्त झाले. पटेल म्हणाले की, सुमारे १.२० लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड करण्यात आली होती. ऊस पिक काढणीसाठी तयार आहे. परंतु शेतात पाणी साचल्याने तोडणीला उशीर होत आहे. सुमारे २०,००० हेक्टरवर उसाची नवीन लागवड झाली, त्यापैकी सुमारे ६,००० हेक्टरमधील क्षेत्राचे पावसामुळे नुकसान झाले आहे.

पटेल म्हणाले, दक्षिण गुजरातमध्ये कृषी विभागाची सुमारे ४० पथके सर्वेक्षण करत आहेत. त्यांच्या मूल्यांकनाच्या आधारे मदतीचे उपाय जाहीर केले जातील. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दर्शन नाईक यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे दक्षिण गुजरातमधील शेतकऱ्यांचे सुमारे १५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. भात आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसानीचे मूल्यांकन करून मदतीच्या उपाययोजना जाहीर कराव्यात. नाईक म्हणाले की, भाजीपाला आणि नगदी पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. उसामध्ये शेतकऱ्यांची प्रती बिघा सुमारे १७,००० रुपये गुंतवणूक आहे, तर भातासाठी सुमारे २०,००० रुपये खर्च येतो. नाईक म्हणाले. पिकांचे झालेले नुकसान मोजताना सरकार पावसाचे प्रमाणही विचारात घेतले पाहिजे. नाईक यांनी मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here