गुजरात : गुजरातच्या सहकार क्षेत्राने देशासमोर आदर्श उदाहरण प्रस्थापित केले आहे. त्यातून समाजाच्या सर्व वर्गांना विकासाची संधी मिळाली आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी केले. शहा यांनी रविवारी तापी जिल्ह्यातील बाजीपूरा येथे आयोजित सहकारातून समृद्धी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
सहकार मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अमित शहा यांच्या या सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अमित शहा म्हणाले, गुजरातची सहकार प्रणाली देशात आदर्शवत आहे. येथील साखर कारखाने देशात सर्वात चांगले आहेत. या क्षेत्राने देशातील गरीब, शेतकरी, महिला, युवकांना विकासाची समान संधी देण्यात आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दक्षिण गुजरात हे सहकारातील घडामोडींचे केंद्रीय स्थान आहे असे शहा म्हणाले. २७५ लिटर दूधाच्या क्षमतेने सुरू झालेल्या सुमूल डेअरीची वाटचाल आता १२०० पुरवठादारांसह २.५ लाख सदस्यंपर्यंत पोहोचले आहे. दररोज सात कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतात. शहा म्हणाले, पंतप्रधानांनी साखर कारखान्याच्या सहकारी समित्यांवर आयकराचा ४० वर्षे जुना मुद्दा अडीच मिनिटात मार्गी लावला. सरकार १३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये ६००० रुपये जमा करीत आहे, असे शहा यांनी सांगितले.