नवी दिल्ली : अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने गुरुवारी ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू या दोन माजी सनदी अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाच्या आयुक्तपदी नेमणूक केली आहे. माजी आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणुकीचे आयुक्त पद रिकामे होते. काँग्रेसचे नेते, खासदार अधीर रंजन चौधरी हे पंतप्रधानांच्या समितीमधील एकमेव विरोधी पक्षातील नेते होते.
चौधरी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, समितीसमोर उत्पल कुमार सिंह, प्रदीप कुमार त्रिपाठी, इंदभर पांडे, सुखबीर संधू, सुधीर कुमार आणि गंगाधर रहाटे यांची नावे होती. त्यातून आम्ही ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंह संधू यांची निवड केली. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या बातमीनुसार अधीर रंजन चौधरी यांनी समितीच्या कार्यप्रणालीवरही नाराजी व्यक्त केली आहे. बैठकीच्या आधी अधिकाऱ्यांची यादी आपल्याला उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले होते. मात्र बुधवारी आपल्याला २१२ अधिकाऱ्यांची यादी मिळाली, असा दावा चौधरी यांनी केला आहे. दुसरीकडे सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार, चौधरी यांना पाच याद्या पाठविण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये २३६ नावे होती.