बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना यापुढे दरवर्षी सभासद व कामगारांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देणार आहे अशी घोषणा खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केली. कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अध्यक्ष एम. पी. पाटील होते. यावेळी सभासद व कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप वितरण करण्यात आले.
खासदार जोल्ले म्हणाले की, यंदा गळीत हंगामात कारखान्याने ७ लाख टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे. मोलॅसीसपासून इथेनॉल निर्मिती सुरू आहे. पुढील वर्षी प्रतिदिन दहा हजार टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट असेल. त्यादृष्टीने कारखान्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तयारी करावी. यंदा गळीत हंगामात ऊस तोडणी कामगारांअभावी ऊस वेळेवर तोडला गेला नाही. यापुढे निपाणी तालुक्यातील प्रत्येक ग्रामीण भागात लोकल तोडणी ऊस वाहतूक तयार होणे गरजेचे आहे. आमदार शशिकला जोल्ले यांचे भाषण झाले. अध्यक्ष पाटील म्हणाले की, यंदा १२६ दिवसांत सात लाख टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या विकासासाठी ऊस विकास योजनेतून ७७ लाख रुपये वाटप केले आहेत. दरम्यान, श्रीकांत बन्ने यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन पवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. कारखान्याच्या प्रगतीबद्दल कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. पालकांच्यावतीने सुरेश पाटील व विद्यार्थ्यांच्यावतीने धनश्री संकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले.