बेळगाव : हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याने यंदा दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या वाढवलेली ८५०० मेट्रिक टन क्षमता १५ हजार मेट्रिक टन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इथेनॉल उत्पादन व वीज निर्मितीमध्ये वाढ करून आगामी काळात कारखाना निश्चित नफ्यात येईल, असे प्रतिपादन खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी केले. हालसिद्धनाथ कारखान्याच्या ३७ व्या गळीत हंगाम बॉयलर प्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी चेअरमन एम. पी. पाटील होते.
आ. शशिकला जोल्ले म्हणाल्या की, गेल्या पाच वर्षांत कारखान्याचा कायापालट झाला आहे. सहकार तत्त्वावरील हा कारखाना देशात अग्रेसर ठरेल, असा विश्वास आम्हाला वाटतो. यावेळी निडसोशी मठाचे शिवलिंगेश्वर स्वामी यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन झाले. तर अल्लमप्रभू महास्वामींच्या हस्ते गव्हाणीत ऊस मोळी टाकण्यात आली.
कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी यांनी स्वागत केले. व्हा. चेअरमन पवन पाटील यांनी प्रास्ताविक केले. अनिल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी संचालक आप्पासाहेब जोल्ले, विश्वनाथ कमते, अविनाश पाटील, रामगोंडा पाटील, सुकुमार पाटील, समित सासणे, जयकुमार खोत, वैशाली निकाडे, श्रीकांत बन्ने, शरद जंगटे, विनायक पाटील, गीता पाटील आदी उपस्थित होते.