न्यू आयबेरिया (अमेरिका) : चीनी मंडी- अमेरिकेच्या दक्षिण भागात असलेल्या लुईसियाना प्रांतात आता ऊस तोडणीचा हंगाम सुरू झाला आहे. फ्रेंच लोकांची वसाहत असलेल्या या प्रांताला अॅकाडिएना म्हणूनही ओळखले जाते. सप्टेंबरचा अखेरचा काळ आणि ऑक्टोबरची सुरुवात ही अॅकाडिएना आणि टेची भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लगबगीची असते, अशी माहिती लुईसियाना प्रांताच्या कृषी विभागाचे ब्लेअर हेबर्ट यांनी दिली.
या भागात जुलैपासून झालेल्या पावसामुळे तोडणी आणि पुढच्या हंगामाची पेरणी या सगळ्यालाच उशीर झाला आहे. याबाबत हेबर्ट म्हणाले, ‘दुर्दैवाने यावर्षी आतापर्यंत ८० टक्के तोडणी झाली आहे. इतर काही भागात यापेक्षाही कमी तोडणी झाली असावी, असा अंदाज आहे. शेतकरी अजूनही आपली जमीन कोरडी होण्याची वाट पाहत आहेत. जेणेकरून पुढच्या उसाची लागवड करता येईल.’ निसर्ग शेतकऱ्यांवर मेहेरबान झालेला दिसत नाही.
गेल्या वर्षीच्या हंगामात लुईसियाना प्रांतात १८ लाख २० हजार टन ऊस उत्पादन झाले होते. यावर्षी किती उत्पादन होईल, हे आताच सांगणे घाईचे होणार आहे. पण, हेबर्ट यांच्या म्हणण्यानुसार पीक समाधानकारक दिसत आहे. ते म्हणाले, ‘अमेरिकेच्या कृषी विभागाकडून उसाचे परीक्षण करणे सुरू आहे. आम्हाला आशा आहे की यंदा पीक चांगले होईल. एक जुलैपासून पिकाची वाढ खूपच चांगली झाली असल्यामुळे त्यात साखरेचा अर्क जास्त असणार आहे. त्यामुळे यंदाचा हंगाम गोड जाईल.’