अंबाला : ऊसाचे पैसे देण्यास उशीर झाल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी नारायणगढ साखर कारखान्याच्या गेटसमोर महापंचायत घेतली. कारखान्याच्या अधिकाऱ्यांना दोन तास कोंडून ठेवले. थकबाकी देण्यासाठी शेतकऱ्यांनी कारखान्याला दहा दिवसांची मुदत दिली आहे. थकीत पैसे न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.
भारतीय किसान युनियन (चारुनी) आणि ऊस संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली जमलेल्या शेतकऱ्यांनी २२ मार्च रोजी पुढील महापंचायत आयोजित करण्याचा निर्णय घेतला.
बिकेयूचे (चारुनी) प्रवक्ते राजीव शर्मा यांनी सांगितले की, गेल्या गळीत हंगामातील सुमारे १०२ कोटी रुपये थकीत आहेत. कारखान्याकडे ४० कोटी रुपयांची साखर शिल्लक आहे. कारखान्याचे अधिकारी फक्त आश्वासन देत आहेत. पण वेळेवर पैसे मिळत नाहीत. शेतकऱ्यांना आंदोलन करण्यास कारखानदार भाग पाडत आहेत.
बीकेयूचे (चारुनी) प्रमुख गुरुनाम सिंह सांगितले की, कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी २० जानेवारीपर्यंतचे पैसे देण्याचे आश्वासन दिले आहे. जर वेळेत पैसे मिळाले नाहीत तर २२मार्च रोजी महापंचायत आयोजित करुन आंदोलनाची भूमिका ठरवू.
नारायणगड कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेंद्र मलिक म्हणाले, आमच्याकडे उपलब्ध असलेली साखर गहाण ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा जाली आहे. आम्ही वीस जानेवारीपर्यंतचे पैसे देण्याचा प्रयत्न करू. आम्ही आमच्या स्तरावर प्रयत्न करीत आहोत. शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर दिली जाईल.