साखर उत्पादनात भारत हा मोठा उत्पादक देश आहे. उसाशी संलग्न जे उप पदार्थ तयार होतात, त्यामध्येही भारत अग्रेसर आहे. देशातील सर्व राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले मिळावीत आणि ऊस लागवड वाढावी यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. राज्य सरकार साखर कारखान्यांचे व्यवस्थापन करते. या कारखान्यांकडून साखर वगळता इतरही उपपदार्थ निर्मिती केली जाते. यामध्ये इथेनॉलचा समावेश आहे. हरियाणा सरकारने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, हरियाणाचे सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले की, यावर्षी १०.७५ टक्के साखर उताऱ्यासह शाहबाद कारखान्याने ७.५० लाख क्विंटल साखर उत्पादन वाढवले आहे. हा एक उच्चांक आहे. राज्यात येथे एकमेव इथेनॉल प्लांट आहे. राज्य सरकार इथेनॉल प्लांटबाबत मोठा निर्णय घेत आहे. त्यासाठी साखर उत्पादनाची स्थिती तपासली जाईल. राज्यात ११ सहकारी साखर कारखाने आहेत. या सर्व कारखान्यांत आता इथेनॉल प्लांट असेल. त्यातून इथेनॉल उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढू शकेल.
सहकार मंत्र्यांनी सांगितले की, सरकार शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास कटिबद्ध आहे. राज्यात ८० टक्के शेतकऱ्यांना २६३ कोटी रुपये ऊस बिले देण्यात आली आहेत. उर्वरीत शेतकऱ्यांनाही लवकरच बिले अदा केली जातील. राज्यात उसाचा दर ३७२ रुपये प्रती क्विंटल आहे. सरकार इथेनॉल उत्पादनाला प्राधान्य देत असून आता प्रत्येक कारखान्यात इथेनॉल प्लांट उभारला जाईल.