हरियाणा : ऊस पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना पेरणी आणि तोडणी यंत्रे अनुदानावर उपलब्ध करून द्यावीत, जेणेकरून ऊसाचे उत्पादन घेता येईल अशी मागणी हरियाणाचे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्याम सिंह राणा यांनी केंद्रीय अर्थसंकल्प पूर्व बैठकीत केली. यातून भाताऐवजी इतर पिके घेतली जाऊ शकतात आणि पाण्याचीही बचत होईल असे ते म्हणाले. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या कृषी मंत्र्यांसोबत कृषी आणि फलोत्पादनाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक झाली.
यावेळी मंत्री राणा यांनी फलोत्पादनाला चालना देण्यासाठी ४० ते ५० हेक्टरचे छोटे क्लस्टर तयार करण्याची गरज असल्याचे सांगितले. राणा म्हणाले की, सध्या नैसर्गिक शेतीच्या क्षेत्रात तपशील आणि मानकीकरणाचा अभाव आहे. नैसर्गिक शेती उत्पादनाच्या गुणवत्तेवर किंवा लागवड प्रक्रियेच्या किंवा दोन्हीच्या आधारावर प्रमाणित करायची आहे की नाही यावर काम करण्याचे निर्देश केंद्रीय कृषी संस्थांना द्यावेत. पिकांचे अवशेष जाळल्याने होणाऱ्या प्रदूषणाकडेही त्यांनी लक्ष वेधले. राणा म्हणाले की, राज्याने शेतातील आगीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात मोठी प्रगती केली आहे. यावर्षी, ४० टक्क्यांनी यात घट झाली आहे आणि हरियाणात शेतातील आगीच्या घटना ७०० पेक्षा कमी मर्यादित आहेत. २०१८ पासून हरियाणातील बागायती पिकांसाठी भावांतर नुकसान भरपाई योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत २१ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. बाजारातील पिकांचे भाव खर्चापेक्षा कमी असताना, खर्चाची किंमत आणि पीक विक्री यातील तफावत शासनाकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यात आली. या योजनेचे चांगले परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.