अंबाला : कारखान्याकडून ऊसाचे पैसे देण्यास उशीर होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय किसान युनीयनच्या (बिकेयू) नेतृत्वाखाली नारायणगढ साखर कारखान्याबाहेर पंचायतीचे आयोजन केले. जर शेतकऱ्यांचे थकीत ३५ कोटी रुपये २० एप्रिलपर्यंत कारखान्याने दिले नाहीत तर आंदोलन सुरू करण्याचा इशारा देण्यात आला.
कारखान्याने चालू गळीत हंगामातील सुमारे १०५ कोटी रुपयांचा ऊस खरेदी केला आहे असा दावा शेतकऱ्यांनी केला. तर कारखान्याकडे सद्यस्थितीत २८ कोटी रुपयांचा साखरेचा साठा शिल्लक असल्याचे सांगण्यात आले.
बीकेयूचे विभागीय अध्यक्ष बलदेव सिंह म्हणाले, ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसात पैसे मिळाले पाहिजेत असा नियम आहे. मात्र, नारायणगढ कारखाना कधीच उसाचे पैसे वेळेवर देत नाही. आम्हाला पैसे मिळविण्यासाठी वारंवार बैठका घ्याव्या लागतात. कारखान्याला इशारा द्यावा लागतो. आता आम्हाला अधिकाऱ्यांनी २० एप्रिलपर्यंत ३५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही त्यांना अल्टिमेटम दिला आहे. जर मुदतीत पैसे दिले गेले नाहीत तर महापंचायत आयोजित करून मोठ्या आंदोलनाला सुरुवात केली जाईल असा इशारा देण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.