चंदीगड / कर्नाल : राज्यात वारंवार आंदोलने करूनही सरकारला समजविण्यात अपयशी ठरल्यानंतर शेतकऱ्यांनी शुक्रवारी राज्यातील सर्व साखर कारखान्यांची मुख्य प्रवेशद्वारे बंद करून ऊस पुरवठा रोखला. भारतीय किसान युनियनच्या (चारुनी) नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांची प्रवेशद्वारे बंद केली. आणि ऊस पुरवठा बेमुदत कालावधीसाठी रोखल्याचे जाहीर केले. बिकेयू (चारुनी)ला राज्यातील बिकेयू (टिकैत) आणि इतर शेतकरी संघटनांशी जोडलेल्या शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळाला आहे. जोपर्यंत सरकारकडून उसाचा SAP प्रती क्विंटल ₹ ३६२ पासून ₹ ४५० करण्याची मागणी मंजूर केली जात नाही, तोपर्यंत त्यांनी आपले आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हास्तरीय समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत.
बिकेयू (चारुनी)चे राज्य अध्यक्ष गुरनाम सिंह चारुनी यांनी सांगितले की, सर्व १४ कारखाने बंद करण्यात आले आहेत. जोपर्यंत उसाच्या दरात वाढ होत नाही, तोपर्यंत गाळप करू दिले जाणार नाही. ते म्हणाले की, साखर कारखाने बंद करण्याशिवाय आमच्याकडे अन्य कोणताही पर्याय उरला नाही. पुढील निर्णय २३ जानेवारी रोजी कुरुक्षेत्रमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय महापंचायतमध्ये घेतला जाईल. कर्नालमध्ये मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला असतानाही शेतकरी साखर कारखान्यांपर्यंत पोहोचले आणि त्यांनी जिल्ह्यातील तीन कारखाने बंद केले. शेतकऱ्यांना ऊस कारखान्यापर्यंत नेण्यास परवानगी दिली नाही.