शहाबाद-मार्कंडा : शाहाबादमध्ये मार्कंडा नदीच्या पुराचे पाणी घुसल्याने साखर कारखान्यावर मोठे संकट कोसळले आहे. कारखान्यात जवळपास ४ फूट पाणी भरल्याने कोट्यवधी रुपयांची साखर खराब झाली. दुसरीकडे कॉलन्यांमध्ये राहाणाऱ्या कर्मचाऱ्यांची आयुष्यभरची पुंजी, घरातील साहित्य पावसाने नष्ट झाले आहे. त्यामुळे साखर कारखाना प्रशासनासह कर्मचारी हवालदिल बनले आहेत.
साखर कारखान्यातील मशीनरी, गोदाांमध्ये ठेवलेली मशीनरी आणि कार्यालयातील फर्निचर, कम्प्युटर पूर्णपणे खराब झाले आहेत. पाच दिवसांपूर्वी साखर कारखान्याच्या कॉलनीत पुराचे पाणी घुसले. ते वाढत जावून जवळपास चार फुटांपेक्षा अधिक झाले. त्यामुळे कोणालाच साहित्य हलवण्याची संधी मिळाली नाही. कर्मचारी कसेबसे आपला जीव वाचवून तेथून सुरक्षित स्थळी आले.
दैनिक ट्रिब्यूनमधील वृत्तानुसार, साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजीव प्रसाद यांनी सांगितले की, सध्याच्या नैसर्गिक संकटाने सर्वजण हताश आहेत. मात्र, तत्काळ कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये मदत शिबिर सुरू करण्यात आले आहे. येथे कामगारांच्या व पूरग्रस्त नागरिकांच्या राहण्याची, खाण्या-पिण्याची, मोबाइल टॉयलेट, औषधोपचार तसेच विजेची व्यवस्था करण्यात आली आहे.