रोहटक : राज्य सरकार साखर कारखान्यांना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी इथेनॉल प्लांट स्थापन करणार आहे अशी घोषणा सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी केली. यासोबत विजेचे उत्पादनही केले जाईल, असे ते म्हणाले. डॉ. लाल यांनी सांगितले की, शाहाबाद साखर कारखान्यात इथेनॉल प्लांट स्थापन केला आहे आणि आणखी दोन प्लांट कर्नाल व पानीपत साखर कारखान्यात स्थापन केले जातील. रोहटक जिल्ह्यातील भाली आनंदपूर गावातील सहकारी साखर कारखान्याच्या २०२२-२३ मधील गळीत हंगाम प्रारंभ प्रसंगी त्यांनी शेतकरी आणि कामगारांशी संवाद साधला.
याबाबत ट्रिब्यून इंडियामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, सहकार मंत्री डॉ. बनवारी लाल यांनी सांगितले की, राज्यातील सर्वच साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आणि दोन छोट्या कारखान्यांमध्ये इथेनॉल प्लांट सुरू केला जाईल.
रोहटक विभागीय आयुक्त जगदीप सिंह यांनी साखर कारखाना हा नफा मिळविणारा उद्योग बनण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांच्या कामगारांचे कौतुक केले. कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक मेजर गायत्री अहलावत यांनी सांगितले की, रोहटक, भिवानी, चरखी दादरी, झज्जर आणि सोनिपत जिल्ह्यांतील २५६ गावांतील ६,००० हून अधिक शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या ६० लाख क्विंटल उसाचे गाळप केले जाईल.