भिवानी: हरियाणामध्ये आतापर्यंत जवळपास ५० लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी झाली आहे, अशी माहिती कृषि मंत्री जयप्रकाश दलाल यांनी दिली. भिवानी जिल्ह्यातील लोहारूमध्ये ईद-उल-फित्र व भगवान परशुराम जयंतीच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. कृषीमंत्री म्हणाले की, अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने खराब झालेल्या पिकांचा डाटा जिल्हा स्तरावर नोंदविण्यात आला आहे. एफसीआरच्या मंजुरीनंतर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा केले जातील.
पंजाब केसरीमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, कृषीमंत्री जयप्रकाश दलाल म्हणाले की, मी हरियाणातील मंडयांची पाहणी केली आहे. गहू खरेदीबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. गव्हाची खरेदी गतीने करावी अशी सूचना केली आहे. गेल्या १० ते १२ दिवसात ५० लाख मेट्रिक टनाची खरेदी झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी उपायुक्तांना निर्देश दिले आहेत. शेतकऱ्यांना सुविधा देण्याबाबत पर्याय शोधले जात आहेत. पुढील सहा महिन्यात ६०,००० नोकऱ्या दिल्या जातील असेही त्यांनी सांगितले.