चंडीगढ : हरियाणामध्ये या रब्बी हंगामातील गहू खरेदीने गेल्यावर्षीचा आकडा पार केला आहे. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या ई खरेदी पोर्टलच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेल्या राज्यव्यापी अहवालानुसार, सरकारी एजन्सींनी आधीच ७१.५ लाख मेट्रिक टन गहू खरेदी केला आहे. गेल्यावर्षीच्या ७०.३ लाख मेट्रिक टनापेक्षा तो अधिक आहे. अहवालानुसार, खरेदी अहवालात सिरसा ८.५२ लाख मेट्रिक टनासह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठोपाठ कर्नालमध्ये ७.७३ लाख मेट्रिक टन, जिंद ७.३६ लाख मेट्रिक टन, फतेहाबाद ६.८६ लाख मेट्रिक टन आणि कॅथल ६.७४ लाख मेट्रिक टन आहे.
केंद्रीय साठ्यासाठी चार एजन्सी, म्हणजे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभाग, हॅफेड, हरियाणा वखार महामंडळ आणि भारतीय अन्न महामंडळ (एफसीआय) यांनी राज्यातील ४१४ खरेदी केंद्रांवर गहू खरेदी केला आहे. हरियाणात सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीवर पीक घेतले जाते आणि अंदाजे १२० लाख मेट्रिक टन गव्हाचे उत्पादन होते. सरकारने २०२३-२४ हंगामात ६३ लाख मेट्रिक टनांच्या तुलनेत सुमारे ६५ लाख मेट्रिक टन गहू खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवले होते.
राज्यात एक एप्रिलपासून सुरू झालेली खरेदी एक आठवड्याच्या मुदतवाढीनंतर २२ मे रोजी संपली. 15 मे रोजी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने केंद्राला पत्र लिहून खरेदी एक आठवडा वाढविण्याची मागणी केली, ज्यामध्ये काढणीला होणारा विलंब आणि दररोज किमान २०,००० मेट्रिक टन गव्हाची आवक असल्याचे म्हटले होते.