हिसार: हरियाणा कृषी विद्यापीठाने नव्याने विकसित केलेल्या सीओएच १८८, सीओएच १७६ आणि सीओएच १७९ या नवीन जाती राज्यातील ऊस लागवडीचे भविष्य घडवतील. एचएयूने विकसित केलेल्या जाती कोएच ५६ आणि कोएच ११९ या प्रजातीही खूप लोकप्रिय आहेत. विद्यापीठाने विकसित केलेले कोएच १६० ही प्रजाती केवळ हरियाणामध्येच नव्हे तर शेजारच्या राज्यांमध्येही लोकप्रिय आहे, असे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. बी. आर. कंबोज यांनी केले. विद्यापीठाने यमुनानगरच्या सरस्वती शुगर मिल्सशी सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर एचएयूच्यावतीने मानव संसाधन व्यवस्थापन संचालक डॉ. अतुल धिंग्रा आणि कारखान्याच्यावतीने वरिष्ठ उपाध्यक्ष डी. पी. सिंग यांनी स्वाक्षरी केली.
कुलगुरू प्रा. कंबोज यांनी सांगितले की, ऊस पिक देशभरासह हरियाणासाठीही अत्यंत महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात १.०७ लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पिकवला जातो. त्याचे उत्पादन ८८.८२ लाख टन असून उत्पादकता ८१९ क्विंटल प्रती हेक्टर आहे. साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. के. सचदेवा म्हणाले की, राज्यात चौदा साखर कारखाने आहेत. कारखानदार उसावर प्रक्रिया करून साखर, इथेनॉल आणि वीज बनवतात. कर्नाल प्रादेशिक संशोधन केंद्राचे प्रादेशिक संचालक डॉ. राजबीर गर्ग यांनी ऊस पिकात विद्यापीठाच्या योगदानाविषयी माहिती दिली. माध्यम सल्लागार डॉ. संदीप आर्य, डॉ. रेणू मुंजाळ आणि आयपीआर सेलचे प्रभारी डॉ. योगेश जिंदाल उपस्थित होते.