पलवल : हरियाणातील पलवलमध्ये चार जिल्ह्यांतील एकमेव साखर कारखाना १८ मे रोजी बंद होणार आहे. मात्र, आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप झालेले नाही. ऊस शेतातच वाळू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. कारखान्यात कामगारांची कमतरता असल्याने गाळपाची गती संथ आहे. दुसरीकडे कारखाना ऊस घेत नसल्याने शेतकरी स्वतः ट्रॅक्टरमध्ये भरून ऊस कारखान्याकडे आणू लागले आहेत. त्यामुळे कारखान्याबाहेर राष्ट्रीय महामार्गा पर्यंत ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीची रांग लागली आहे. आपला ऊस शेतातच वाळू लागल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
भास्करमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पलवलमध्ये जवळपास २० हजार एकर जमिनीत ऊस पिक घेतले जाते. कारखाना सुरू झाल्यापासून मे महिन्यापर्यंत सर्व ऊस कारखाना खरेदी केला जातो. मात्र, आतापर्यंत पूर्ण ऊस खरेदी झालेली नाही. त्यामुळे ऊस शेतातच वाळत आहे. शेतकऱ्यांनी पलवलमधील धतीर गावात जनसंवाद कार्यक्रमावेळी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही जिल्हा प्रशासन व अधिकऱ्यांना शेतकऱ्यांचा ऊस खरेदी केला जावा, यासाठी निर्देश दिले होते. त्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांना तोडणी पावत्या पाठवून ऊस आणण्यास सांगितले. मात्र, आता ऊस वाळण्याच्या भीतीने शेतकरी आपला ऊस एकाचवेळी कारखान्याकडे घेवून येत आहेत. परिणामी कारखान्यासमोरील डोकेदुखी वाढली आहे.