कर्नाल : कुंजपुरा आणि कर्नाल विभागातून आलेल्या विविध गावांतील शेतकऱ्यांनी कर्नाल सहकारी साखर कारखान्याकडून येत असलेल्या अडचणींबाबत घरौंदाचे आमदार हरविंदर कल्याण यांची भेट घेतली. जवळपास सहा ते सात गावातील शेतकरी खैराजपूरचे माजी सरपंच कुलविंदर सिंह यांच्या घरी एकत्र जमले. तेथून आमदारांच्या भेटीला आलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्यावतीने सुरू असलेल्या ऊस सर्व्हेवर आक्षेप घेतला.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकऱ्यांनी आमदार कल्याण यांना सांगितले की, साखर कारखान्याच्या नुतनीकरणानंतर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यात आली आहे. तरीही शेतकऱ्यांना आपला ऊस घेवून दुसऱ्या कारखान्याला जावे लागत आहे. जोपर्यंत साखर कारखान्याच्यावतीने गाळप हंगामात येणाऱ्या सर्व अडचणी दूर केल्या जात नाहीत, तोपर्यंत शेतकऱ्यांना सुविधा पोहोचणे शक्य नाही. शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशातील गावे कर्नाल साखर कारखान्याला जोडल्याबद्दल आक्षेप नोंदवला.
उत्तर प्रदेशमधून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या उसाबरोबरच येणारे दलाल स्वस्त दरात ऊस खरेदी करून तो कारखान्याला विकून पैसे कमावत आहेत. आमदार हरविंदर कल्याण यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांना याबाबत सविस्तर माहिती देण्याचे आदेश दिले. या गोष्टीची दखल घेवून त्रुटी दूर केल्या जातील असे आमदार कल्याण यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले.