अंबाला: हरियाणामधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे ७० कोटी रुपयांची थकबाकी आहे. हे पैसे त्वरीत मिळावेत या मागणीसाठी ऊस उत्पादकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मीडियाचा रिपोर्ट अनुसार, नारायणगढ साखर कारखान्याने गेल्यावर्षी संपलेल्या गळीत हंगामातील सुमारे १.४४ कोटी रुपये ऊस उत्पादकांना दिलेले नाहीत. तर गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंतची जवळपास ६८ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
सरकारी निकषानुसार, ऊस गळीतानंतर १४ दिवसांत उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी केलेल्या ऊसाचे पैसे देणे बंधनकारक आहे. दीर्घ काळापासून थकीत असलेल्या देण्याबाबत काही शेतकऱ्यांनी नारायणगढ साखर कारखान्यासमोर बैठक घेतली.
यावेळी भारतीय किसान युनीयनचे (चारुनी) जिल्हा प्रमुख मलकित सिंह म्हणाले, शेतकऱ्यांना आपले पैसे मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांसमोर निवेदने द्यावी लागतात. थकबाकी मिळवण्यासाठी आंदोलन करावे लागते ही स्थिती योग्य नाही. स्थानिक शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांचे एकूण ४.५ कोटी रुपयांची थकबाकी कारखान्यांकडे आहे. आम्हाला एक ते दोन दिवसांत मागील देणी दिली जातील असे आश्वासन देण्यात आले आहे. तर नव्याने खरेदी केलेल्या उसाची बिले शुक्रवारपर्यंत केली जातील असे सांगण्यात आले आहे. जर शुक्रवारपर्यंत कारखान्याच्या प्रशासनाने पैसे दिले नाहीत, तर आम्ही आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे.