अंबाला: अवकाळी पावसाने उभ्या उसाची तोडणी विस्कळीत झाली आहे. परिणामी साखर कारखान्यांना वेळेत पुरवठा आणि व्यवस्थापनासाठी कमी ऊस उपलब्ध आहे. उपलब्ध माहितीनुसार, शाहाबाद सहकारी साखर कारखान्याचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट ७० लाख क्विंटलहून अधिक आहे आणि आतापर्यंत ५३ लाख क्विंटल उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याची एका दिवसाची गाळप क्षमता ५०,००० क्विंटलची आहे. मात्र, शुक्रवारी केवळ २६,००० क्विंटल ऊस शिल्लक होता.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, आधी उसाच्या एसएपीसाठी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे कामकाजावर परिणाम झाला होता. आणि आता पावसामुळे ऊस पुरवठा मंदावल्याने कामकाज विस्कळीत झाले आहे. गेल्या आठवड्यात दोन दिवसांसाठी कामकाज बंद करावे लागले. शाहाबाद सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक राजीव प्रसाद यांनी सांगितले की, कारखान्याचे गाळप नियमित व्हावे यासाठी शेतकऱ्यांना तोडणी वेळापत्रक जारी केले जाते. ते ठरवून दिलेल्या तारखेला आपला ऊस घेवून येतात. मात्र, पावसामुळे तोडणी थंडावली आहे. आणि शेतकरी कारखान्याला ऊस घेऊन येण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आवक घटली. कमी क्षमतेवर कारखाना सुरू ठेवल्यास नुकसान होते. साखर कारखान्यात दररोज ३ लाख युनिट विजेचे उत्पादन केले जाते. आणि यातही अडथळे आले आहेत. आम्ही हंगाम २५ एप्रिलच्या आसपास समाप्त होईल अशी अपेक्षा केली होती. मात्र, आता हा हंगाम मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे. आम्ही शेतकऱ्यांना हवामान अनुकूल झाले की तोडणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे कारखान्याला पुरेसा ऊस उपलब्ध होईल.
ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष विनोद राणा यांनी सांगितले की, बहुतांश शेतकरी आपला ऊस स्वतः तोडतात. यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जातो. त्यामुळे पावसाने तोडणी थांबवली आहे. पावसाने पुढील हंगामासाठीच्या पेरणीचे वेळापत्रक बिघडले आहे. याशिवाय नारायणगढ साखर कारखान्याकडून उशीरा मिळणारी बिले हा सुद्धा शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय बनला आहे.