अंबाला : नारायणगड साखर कारखान्याकडून ऊस बिले मिळण्यास उशीर होत असल्यानेसंतप्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी निदर्शने केली. याप्रश्नी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी १५ दिवसांत हा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला.
यावेळी शेतकऱ्यांनी आंदोलनासाठी भारतीय किसान युनीयनचे नेते, राकेश टिकैत यांनाही निमंत्रीत करण्याचा निर्णय घेतला. भारतीय किसान युनीयनचे झेंडे, फलक घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी साखर कारखान्यांसमोर एकत्र येऊन आपल्या मागण्यांच्या घोषणा दिल्या. नारायणगडचे तहसीलदार दिनेश ढिल्लो, नारायणगड साखर कारखान्याचे सीईओ नरेंद्र मलीक यांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना शांत केले. भारतीय किसान युनीयनचे विभाग अध्यक्ष बलदेव सिंह म्हणाले, ५ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना डिसेंबर महिन्याची थकबाकी तातडीने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आतापर्यंत फक्त ७ डिसेंबरपर्यंतचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत. कारखान्याने आतापर्यंत १०९ कोटी रुपयांच्या उसाचे गाळप केले आहे. मात्र, शंभर कोटी रुपयांची बिले अद्याप प्रलंबित आहेत.
याबाबत लवकरात लवकर पैसे देण्याची व्यवस्था करू असे आश्वासन कारखान्याचे सीईओ मलिक यांनी दिले.