कुरुक्षेत्र : राज्यातील गव्हाचा हंगाम समाप्त झाला आहे. सरकारी खरेदीही १५ मेपर्यंत समाप्त होईल. यावेळी गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक झाले आहे. हंगामादरम्यान, विविध कारणांनी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सखल भागात शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या पिकाला फटका बसला असला तरी हंगामात झालेल्या पावसाचा बहुसंख्य शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. ज्यांनी उशीरा पिक घेतले, त्यांचे उत्पादन एकरी १५ ते १६ क्विंटलपर्यंत पोहोचले आहे.
दैनिक ट्रिब्यूनमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा उप कृषी संचालक प्रदीप मिल यांनी सांगितले की, कुरुक्षेत्र जिल्ह्यात यंदा सरासरी ४७ क्विंटल ७७ किलो प्रती हेक्टर उत्पादन मिळाले आहे. तर गेल्या वर्षी हे उत्पादन ४२ क्विंटल प्रती हेक्टर होते. या वर्षी सरासरी १९ क्विंटल २ किलो प्रती एकर जादा गहू उत्पादन मिळाले आहे. मार्च महिन्यातील थंड हवामानाचाही पिकाला फायदा झाला. जिल्ह्यात २६८ शेतकऱ्यांनी नैसर्गिक (सेंद्रीय) पद्धतीने गव्हाचे पिक घेतले. त्यांना प्रती एकर १६ क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळाल्याचे प्रदीप मिल यांनी सांगितले. मंडईत आवकही अधिक झाली आहे. जिल्ह्यात नऊ मेअखेर २३ खरेदी केंद्रांमध्ये ४,७७,१५६ एमटी गव्हाची आवक झाली आहे.