पानीपत : रादौर विभागातील दोहली गावातील युवा शेतकरी वागीश कुमार यांनी जुलै महिन्यातच १२ – १३ फूट उंचीच्या उसाचे उत्पादन केले आहे. आतापर्यंत दोन वेळा या उसाची बांधणी करण्यात आली असून तिसरी बांधणी सुरू आहे. उसासोबत लसुण पीकही घेण्यात आले आहे. या पिकाचा फायदा ऊसाला होत असल्याचे शेतकरी वाशीग कुमार यांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात या युवा शेतकऱ्याला जल संवर्धन कामासाठी चौधरी चरण सिंह हरियाणा कृषी विद्यापीठाने सन्मानित केले आहे.
दैनिक जागरणमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, ३० वर्षीय युवा शेतकरी वागीश कुमार यांनी १२ सप्टेंबर रोजी ऊस लागण केली होती. चार फूट सरीत याची लावण करून लसूण पिक घेतले. मार्च-एप्रिल महिन्यात लसूण पिक तयार झाले. जवळपास ३० क्विंटल लसुण उत्पादन मिळाले. ऊसासोबत लसूण अथवा कांदा पिक घेणे फायदेशीर असल्याचे वागीश यांनी म्हणणे आहे. त्यातून ऊस पिकावर इतर किडींचा हल्ला होत नाही. टॉप बोरर व इतर किडींपासून संरक्षण केले जाते. सध्या या ऊसाची तिसरी बांधणी सुरू आहे. फेब्रुवारी-मार्चपर्यंत ऊसाची बांधणी केली जाते. आता हा ऊस इतका ऊंच आहे की, त्याच्या बांधणीसाठी शिडीची मदत घ्यावी लागेल असे वागीश यांनी सांगितले. प्रती एकर ६०० क्विंटल उत्पादन होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.