सांगली : साखर कारखानदार आधी आपल्या बगलबच्च्यांचा ऊस नेतात आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळवा लागतो. त्यांना ऊस जाळून गाळपासाठी देण्यासाठी कारखानदार भाग पाडतात, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मात्र एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास नेलाय का? तसे उदाहरण असल्यास दाखवून द्या’, असे आव्हान शेट्टी यांनी कारखानदारांना दिले. सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले की, मी खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडली गेली. शेतमालाला दीडपट हमीभाव आणि कर्जमुक्ती ही दोन विधेयके अद्याप मंजूर झालेली नाहीत. माझ्यावर कारखानदार टीका करत आहेत. पण जेंव्हा उस बिलांचा विषय येतो, तेव्हा ते नावच काढत नाहीत. शेतकऱ्यांना बाजूला सारत फक्त बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. शेतकऱ्यांकडे टोळ्या नाहीत, तोडणी यंत्रणांची कमी आणि बहुसंख्या टोळ्या पळून गेल्याने शेतकऱ्यांचा ऊस वाळला. पण हे कारखानदारांना दिसत नाही. ग्रामीण भागात रोजगार शेतीमधूनच मिळतो. नाहीतर लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतमालाला दर मिळावा म्हणून गेली ३० वर्षे संघर्ष सुरू आहे, असे शेट्टी म्हणाले. यावेळी पोपट मोरे, राम पाटील, ॲड. शमशुद्दीन संदे, मानसिंग पाटील, देवेंद्र धस, संदीप राजोबा, राजू पाटील, रवि पाटील, काका रोकडे, अमोल गुरव, कैलास देसाई आदी उपस्थित होते.