मुंबई : इकॉनॉमिक टाईम्स ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार, भारतात फेब्रुवारीमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून त्याचा सर्वाधिक फटका गहू पिकाला बसू शकतो. फेब्रुवारीमध्ये भारतात सरासरीपेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे, गहू उत्पादक प्रमुख राज्यांमध्ये काही दिवस सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे गहू पिकाला धोका निर्माण होऊ शकतो, असे हवामान विभागाच्या दोन सूत्रांनी सांगितले.
जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश म्हणून भारत ओळखला जातो, पण २०२२ पासून सलग तीन वर्षे खराब पीक उत्पादनानंतर २०२५ मध्ये देशात गव्हाचे भरपूर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. २०२२ मध्ये फेब्रुवारी आणि मार्चमध्ये तापमानात अचानक वाढ झाल्याने जगातील दुसऱ्या क्रमांकाचा गहू उत्पादक असलेल्या भारताला २०२२ मध्ये गहू निर्यातीवर बंदी घालण्यास भाग पडले होते.
फेब्रुवारीमध्ये उत्तर, मध्य आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये कमाल आणि किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामानशास्त्र विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हवामान कार्यालयाकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.हवामान कार्यालय शुक्रवारी फेब्रुवारीसाठी आपला अंदाज जाहीर करण्याची शक्यता आहे.फेब्रुवारीच्या काही दिवसांमध्ये काही राज्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने जास्त वाढू शकते,असे अधिकाऱ्याने सांगितले. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश राज्ये, मध्य प्रदेश आदी देशातील गहू पिकवणारे प्रमुख प्रदेश आहेत.
फेब्रुवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशाच्या उत्तरेकडील आणि वायव्य भागात दिवसाच्या तापमानात मोठी वाढ होऊ शकते, असे ‘आयएमडी’च्या दुसऱ्या अधिकाऱ्याने सांगितले. गहू, रेपसीड आणि हरभरा यांसारख्या पिकांची लागवड ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान केली जाते आणि चांगल्या उत्पादनासाठी त्यांच्या वाढीच्या आणि परिपक्वतेच्या टप्प्यात थंड हवामानाची आवश्यकता असते. जर तापमान दीर्घकाळ सामान्यपेक्षा जास्त राहिले तर आर्द्रतेचा ताण निर्माण होऊन उत्पादनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे मुंबईस्थित ब्रोकरेज कंपनी फिलिप कॅपिटल इंडिया येथील कमोडिटीज रिसर्चच्या उपाध्यक्ष अश्विनी बनसोड म्हणाल्या.