चंदीगढ : भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) उत्तर भारतामधील सामान्य पेक्षा अधिक तापमानासह भीषण उष्णतेची भविष्यवाणी करताना म्हटले आहे की, सलग दुसऱ्या वर्षी पंजाबमधील गव्हाचे पिक यामुळे संकटात येण्याचा धोका आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातील वाढत्या उन्हामुळे पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशसह देसातील धान्याचे कोठारातील गव्हाच्या पिक उत्पादनात सरासरी १० ते ३५ टक्क्यांची घट झाली होती.
लुधियानास्थित पंजाब कृषी विद्यपीठात (पीएयू) हवामान बदल आणि कृषी हवामान विज्ञान विभागप्रमुख पवनीत कौर किंगरा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले की, जर मार्च महिन्यात तापमान ३० डिग्री सेल्सिअसपेक्षा अधिक राहिले तर शेतकऱ्यांसाठी हे चिंतेचे कारण बनले. पारा वाढल्याने धान्याचे आकुंचन होईल. त्यांनी सांगितले की, गेल्यावर्षीही तापमान सामान्यपेक्षा अधिक झाले होते. आणि उत्पादनात घट झाली होती. पंजाबच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी सल्ला देणाऱ्या शिबिरांचे आयोजन केले आहे. गुरुदासपूर जिल्ह्याचे मुख्य कृषी अधिकारी कृपाल सिंह यांनी सांगितले की, आम्ही शेतकऱ्यांना हलके सिंचन आणि पिकात काहीसा ओलसरपणा टिकावा यासाठी पोटॅशियम नायट्रेट (१३०४५) च्या फवारणीचा सल्ला देत आहोत. मात्र, गव्हाच्या पिकाच्या उत्पादनाविषयी, परिणामाविषयी काही भविष्यवाणी करणे घाईचे ठरेल.
पंजाबमधील काही भागात काल पाऊस झाला आणि त्यामुळे तापमानात घट झाली. खरेतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडतो. गेल्या वर्षी या भागात उच्च तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता.
शेतकरी चिंतेत आहेत की गेल्या हंगामाप्रमाणे यंदाही १५ ते २० टक्के उत्पादन घटू शकते. तापमानात अचानक बदल होत आहेत. त्यामुळे मार्च आधी उन्हाचा तडाखा आहे. हलक्या सिंचनाने फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
२०२१-२२ मध्ये देशाच्या धान्य साठ्यात पंजाबने ३१ टक्के गहू आणि २१ टक्के तांदळाचे योगदान दिले होते. पंजाबमध्ये ५०.३३ लाख हेक्टरपैकी ४१.२७ लाख हेक्टरवर शेती केली जाते. कृषी तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २०१६ ते २०२० या काळात रंबाजमध्ये दरवर्षी गव्हाचे उत्पादन ५० क्विंटल प्रती हेक्टरवर गेले. मात्र, २०२१ मध्ये ते घटून ४८ तर २०२२ मध्ये ४३ क्विंटल प्रती हेक्टरवर आले.