बिजिंग : चीनची राजधानी बिजिंग सध्या भीषण पुराच्या विळख्यात आहे. गेल्या १४० वर्षातील सर्वाधिक पावसाने ही परिस्थिती उद्भवली आहे.
याबाबत बिजिंग हवामानशास्त्र विभागाने सांगितले की, राजधानीमध्ये १४० वर्षापासून सर्वाधिक पाऊस कोसळला आहे. या वर्षी नोंदविण्यात आलेला पाऊस ७४४.८ मिलिमिटर आहे. यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणात १८९१ मध्ये ६०९ मिलिमिटर पाऊस कोसळला होता. संशोधकांच्या मतानुसार हवामान बदलामुळे ही समस्या आणखी वाढत आहे.
सीसीटीव्हीने मंगळवारी सांगितले की, बिजिंगमधील पावसाने कमीत कमी ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर डझनभर लोक बेपत्ता आहेत. बुधवारी शेजारील हेबेई प्रांतामध्ये पुराचे केंद्र वळले आहे. बीजिंगच्या फांगशान जिल्ह्यात आणि हेबेई यादरम्यानच्या सीमेवरील एक पार्क पुर्णपणे पाण्यात बुडाले आहे. मुसळधार पावसाने आलेला हजारो टन कचरा एका पुलाजवळ अडकला आहे. नेहमी कोरड्या असलेल्या बिजिंग आणि आसपासच्या भागात शनिवारी पावसाला सुरुवात झाली.