हरिद्वार : सलग दोन दिवसांपासून पाथरी परिसरातील गावांमध्ये हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांच्या पिकांची नासाडी सुरु केली आहे. वनविभागाकडून पिकांची नुकसान भरपाई मिळावी व वन कर्मचाऱ्यांची रात्री गस्त घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांना हत्तींचा कळप कातरपूर, चांदपूर गावच्या हद्दीत दिसला आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, शेतकरी राजेंद्र चौहान, मोनू चौहान, रमेश कुमार, नितीन कुमार यांनी सांगितले की, गंगा नदीत पाणी कमी असल्याने कळप सातत्याने गावांकडे येत आहेत. शेतकरी राजेंद्र चौहान यांनी सांगितले की, त्यांचे उसाचे पीक हत्तींनी उद्ध्वस्त केले आहे. हत्ती इतर शेतकऱ्यांची पिकेही तुडवत आहेत. त्यामुळे वन विभागाच्या नाकर्तेपणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. शेतकऱ्यांनी हत्तीच्या बंदोबस्तासाठी वनविभाग कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. .
हत्तींप्रश्नी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी यशपाल, धीरज कुमार, नूतन उपाध्याय, संदीप चौहान, योगेंद्र सिंग, हुकम सिंग, राजेंद्र चौहान, प्रेमजीत सिंग, राकेश चौहान, टीटू चौहान, दिनेश चौहान, चरण सिंग, पंकज चौहान यांनी केली आहे. उप वनपरिक्षेत्र अधिकारी महावीर नेगी यांनी सांगितले की, हत्तींना रोखण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत, मात्र अनेकदा हत्ती ऊस खाण्यासाठी शेतात येत आहेत.