देशात मान्सूनने दुसऱ्या टप्प्यात गती घेतली आहे. अनेक राज्यांत पुरासारखी स्थिती आहे. तर काही राज्यांत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यांदरम्यान भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशातील १० राज्यांत २० ऑगस्टपर्यंत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. अनेक भागात पुराचा धोका आहे. हवामान विभागाने सांगितले की, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊस कोसळू शकतो. या पावसामुळे तापमान तीन ते चार डिग्रीपर्यंत घसरू शकतो. याशिवाय १७ ऑगस्ट ते १८ ऑगस्ट यांदरम्यान, सौराष्ट्र आणि कच्छ या भागात पाऊस पडू शकतो. तर गोवा आणि कोकणात २० तारखेपर्यंत पाऊस कोसळू शकतो.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गंगा-यमुना नद्यांचा जलस्तर तेजीने वाढत असल्याने कछारी भागात पुराचा धोका आहे. मंगळवारी रात्री आठ वाजता गंगा-यमुनेचा जलस्तर चार-चार सेंटिमिटर प्रती तास गतीने वाढत आहे. पुढील तीन-चार दिवसांपर्यंत जलस्तर वाढण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने तयारी केली आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील गुना, राजगढ, आगर मालवा, रतलाम, नीमच आणि मंदसौर जिल्ह्यात पुराचा अलर्ट देण्यात आला आहे. ओडिसातही पुराचा अलर्ट देण्यात आला आहे.