नवी दिल्ली : देशभरात नुकताच झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सर्वाधिक पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करीत आहेत. गेल्यावर्षी खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अडचणीचा होता. तर यंदा मुसळधार पाऊस, गारपीट आणि जोरदार वारा यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदा देशात विक्रमी गव्हाचे उत्पादन अपेक्षित होते. मात्र पावसाने शेतकऱ्यांचा खेळ बिघडवला आहे. अनेक राज्यांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर गव्हाच्या पिकालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
एबीपी लाइव्हने दिलेल्या वृत्तानुसार, अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा सर्वाधिक परिणाम पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये दिसून आला आहे. या तीन राज्यांमध्ये ५० टक्के गव्हाचे पीक नष्ट झाले आहे. पंजाबमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा आकडा ७० टक्क्यांहून अधिक झाला आहे. यावेळी गव्हाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. या नुकसानीबाबत केंद्र आणि राज्य सरकार गंभीर आहे. कृषी मंत्रालय राज्यांमधील पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करेल. सर्वेक्षणाचे काम राज्य सरकारांच्या मदतीने पूर्ण केले जाईल. पाऊस आणि गारपिटीमुळे गव्हाचे जवळपास १ दशलक्ष टन कमी उत्पादन होण्याची भीती कृषी मंत्रालयाने व्यक्त केली आहे. यंदा, २०२२-२३ या हंगामासाठी केंद्राने ११२.१८ दशलक्ष टन गहू उत्पादनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. पण नुकसान पाहता हे उद्दिष्ट गाठणे शक्य होणार नसल्याचे दिसून येते.