मुंबई : राज्याच्या कृषी विभागाने जाहीर केलेल्या प्राथमिक निष्कर्षानुसार, गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने महाराष्ट्रात सुमारे १.१० लाख हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये ऊस, भात, सोयाबीन, मक्का आणि कापूस यांसारख्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.
कृषी विभागाने राज्यातील विविध भागातील अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुराचा फटका बसलेल्या कृषी क्षेत्राच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केल्याचे इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तामध्ये म्हटले आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, राज्यातील अनेक भागात, दुर्गम भागाचा मुख्य क्षेत्राशी संपर्क तुटल्याने कृषी अधिकाऱ्यांना शेतापर्यंत पोहोचता आलेले नाही. एवढेच नाही तर कोल्हापूरमधील कृषी विभागाच्या कार्यालयातही पुराचे पाणी घुसले होते. गेल्या काही दिवसांत राज्यातील काही भागात सर्वाधिक पाऊस झाला. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यासह कोकणातील सर्व जिल्ह्यांत मोठ्या नुकसानीची माहिती मिळाली आहे. विदर्भ, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाल्याचे कळविण्यात आले आहे. राज्यात गुरुवारपासून विविध ठिकाणी झालेल्या जोरदार पावसानंतर झालेल्या भू स्खलनात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
प्राथमिक अंदाजानुसार, कोल्हापूरमध्ये जवळपास ३५,००० हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले. यामध्ये मुख्यत्वे ऊस पिकाचा समावेश आहे. अशाच पद्धतीने सांगली जिल्ह्यात ४५०० हेक्टर आणि पुणे जिल्ह्यात ५००० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. कोकणात भात पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. पावसामुळे बहुतांश पिके पाण्याखाली आहेत.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link