मेरठ : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसाने उत्तर प्रदेशच्या पश्चिम विभागात तापमानात घसरण नोंदली गेली आहे. त्यामुळे अनेक भागात थंडी वाढली आहे.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार, हवामान विभागाने सांगितले की, मेरठ मध्ये गेल्या ४३ वर्षात प्रथमच जानेवारी महिन्यात सर्वात जास्त थंडी होती. २४ दिवसांत ११२ मिमी पाऊस झाला आहे. पावसामुळे अधिक तापमान १२.८ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरले. ते या वर्षीच्या नियमित तापमानापेक्षा ८ डिग्री कमी आहे. सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठाचे प्रमुख वैज्ञानिक एन. सुभाष यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, चालू महिन्यात पाऊस नेहमीपेक्षा पाच पट अधिक झाला आहे. सततच्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. शेतात पाणी साचल्याने ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. आग्रात सोमवारी दाट धुके होते. आगामी दोन दिवसही अशीच स्थिती राहील असे हवामान विभागाने सांगितले.