कोल्हापूर, दि. 20 ऑगस्ट 2018 : कोल्हापूर परिसरात सुरू असल्याने जोरदार आणि संततधार पावसामुळे उसाची वाढ खुंटली आहे. गेल्यावर्षी ऊस तोडणीनंतर जोमात वाढ होत असणाऱ्या उसाची गती पावसामुळे जाणवणाऱ्या गारव्यामुळे कमी आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात 1 लाख 80 हजार हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीचा ऊस गाळप झाल्यानंतर खोडवा आणि लागण केलेल्या उसाची वाढ जोमात होती. पोषक वातावरण तसेच अपेक्षित पाऊस होत राहिल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला ही उसाने चांगली गती घेतली होती. मात्र त्यानंतर सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे वातावरणात कमालीचा गारठा जाणवत आहे. गेले अनेक दिवस सूर्यदर्शन झाले नाही, त्यामुळे वातावरणातील तापमान कमी होत राहिले आहे. याचा फटका थेट ऊस वाढीवर होताना दिसत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये सुरुवातीला आलेल्या पुरात नदीकाठची उसाची शेती पाण्याखाली गेली होती त्यानंतर 10 ते 12 दिवसांनी पूर ओसरला होता. या पुराच्या पाण्याखाली सापडलेल्या उसाचे मोठे नुकसान झाले होते. दरम्यान पाऊस कमी येईल अशी अपेक्षा असताना मात्र केरळमध्ये सुरू असणाऱ्या अतिवृष्टीचा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ही दिसून येत आहे गेले महिनाभर सतत सुरू असणाऱ्या कमी-अधिक प्रमाणातील बीपावसामुळे वातावरणामध्ये कमालीचा गारवा आहे. हा गारवा ऊस वाढीसाठी घातक ठरत आहे त्यामुळे यावर्षी उसाच्या एकूण उताऱ्यामध्ये घट झालेली दिसून येणार असल्याचा अंदाज ऊस तज्ञ करत आहेत.