नवी दिल्ली : ऊसतोडणी मजुरांच्या टोळीचे मुकादम अंकुश आडे ६० मजुरांसमवेत कोठारी साखर कारखान्याचा ऊस तोडण्यासाठी १५ फेब्रुवारीपासून तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील लालगुडी तालुक्यात आहेत. लॉकडाउन सुरू झाल्यानंतर या मजुरांची अडचण सुरू झाली. कारखान्याकडून सुरवातीचे पाचच दिवस मदत मिळाली. नंतर जवळचा शिधाही संपायला आला होता. पण, तामिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने या कष्टकऱ्यांना अवघ्या एका तासात मदत मिळाली.
मजुरांचे हे प्रकरण परभणीतील जिल्हा मदत केंद्रापर्यंत आणि परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तमिळनाडूमध्ये अडकलेल्या या मजुरांच्या मदतीसाठी हालचाल सुरू झाली. ही मदत पोहोचविण्यात तमिळनाडू प्रशासनातील मराठी अधिकारी आनंद पाटील हे महत्वाचा दुवा ठरले. आनंद पाटील यांनी ही माहिती तमिळनाडूतील आणखी एक मराठी अधिकारी अन्न व नागरी पुरवठा प्रशासनाचे आयुक्त सज्जन चव्हाण यांना दिली. आयुक्त चव्हाण यांनीही प्रशासकीय यंत्रणेचे चक्र वेगाने फिरवून लालगुडीच्या तहसीलदारांना मजुरांपर्यंत धान्य पोहोचविण्याचे आदेश दिले. या आदेशापाठोपाठ लालगुडीच्या तहसीलदारांनी अवघ्या एका तासात स्वतः जाऊन या साठ मजुरांना १०० किलो तांदूळ, २५ किलो गहू आणि पाच किलो तूर डाळ असा धान्यसाठा दिला आणि या ऊसतोडणी मजुरांच्या पोटात अन्नाचा घास पडला. महाराष्ट्रातील साखर कारखाने केवळ ४५ दिवस चालले. त्यामुळे राज्यात काम नसल्याने कामासाठी ऊस तोडणी मजूर तमिळनाडूपर्यंत पोहोचले.
या साठ जणांव्यतिरिक्त बीड, परभणी जिल्ह्यातील जिल्ह्यातील गंगाखेड, परळी, जिंतूर या आणखी २५० ते ३०० ऊस तोडणी मजूर (१३ ते १४ टोळ्या) तमिळनाडूमध्ये आहेत. याच भागात आहे. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सांगून लालगुडीच्या तहसीलदारांना तेथे पाठवले. ज्याप्रमाणे तिरुचिरापल्लीत मराठवाड्यातील ऊसतोड मजूर आहेत, तसेच कोईम्बतूर जिल्ह्यातही बिहारी मजूर आहेत.
परभणीचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे म्हणाले, लाल गुडी तालुक्यात अडकलेल्या मजुरांची समस्या कळल्यानंतरही भाषेच्या अडचणीमुळे माहिती प्रशासनाला समजावून सांगता येत नव्हती. पण तामिळनाडूतील सचिव आनंद पाटील यांच्याशी बोलल्यानतर मदत कार्य वेगाने झाले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.