बारामती : चीनी मंडी
बारामती येथील कृषि प्रदर्शनात ४० फुटांचा ऊस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पुण्यातीलच हडपसर येथील शेतकरी राजेंद्र यादव यांच्या दारात हा ऊस उगवला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या उसाची वाढ होत आहे. हा उंच ऊस पाहण्यासाठी रांगा लागल्या आहेत.
सर्वसाधारणपणे ऊस १४ ते १५ फुटांपर्यंत वाढतो. पण, राजेंद्र यादव यांच्या उसाने ४० फुटांची उंची गाठली आहे. यापुढेही त्याची उंची वाढणार असा दावा यादव करत आहेत. यादव यांच्या उसाची बातमी जशी पसरली तशी त्यांच्या घरी संशोधकांचीही रांग लागली आहे. ऊस १२ ते १३ फुटांपर्यंत वाढल्यानंतर जोराच्या वाऱ्या तुटून जातो. पण, त्याला संरक्षण दिले तर, ऊस वाढत जातो, असा शेतकरी राजेंद्र यादव यांचा दावा आहे.
याबाबत यादव म्हणाले, ‘आम्ही अंगणात ऊस लावला होता. ऊस सात आठ फूट झाल्यानंतर झुकू लागला. त्याला बॅरेकेटिंग करून सरळ केले. त्यानंतर सातत्याने हा ऊस वाढतच आहे. उसाला जर चांगले पाणी मिळले तर ऊस वाढतच जातो याचे हे उदाहरण आहे. आता आम्ही याला ४० फुटांपर्यंत वाढवले असले तरी, तो आणखी वाढू शकतो. त्यामुळेच त्याला कृषि प्रदर्शनात आणले आहे.’
राजेंद्र यांचा ऊस पहायला शेजारच्या गावांतील शेतकरीही येताता. सध्या यादव यांच्या दारात १५ ते १६ ऊस उभे आहेत. पण, जर हा ऊस शेतात लावला तर त्याचीही अशीच वाढ होईल का?, असा प्रश्न आहे.
त्यावर यादव म्हणाले, ‘वाढतच राहणे हा उसाचा स्वभाव आहे. जर, शेतकरी त्याला योग्य सपोर्ट देत असतील, तर हे शक्य आहे. त्याचा काही असा नियम नाही. पण, त्याची प्रणाली विकसित करायला हवी. त्यासाठी वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. पण, हे अशक्य मुळीच नाही.’ या ४० फुटांच्या उसाने यादव यांना प्रदर्शनात सेलिब्रेटी बनवले आहे.
डाउनलोड करा चिनीमण्डी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp