लखनौ : देशात कोरोनाचे उच्चांकी रुग्ण आढळत आहेत. कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरच्या वाढत्या मागणीमुळे उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार सॅनिटायझरच्या उत्पादनाचा उच्चांक निर्माण केला आहे. जवळपास ९७ साखर कारखाने आणि छोट्या युनिटमधून २५ एप्रिलपर्यंत २ कोटी लिटरपेक्षा अधिक सॅनिटायझरचे उत्पादन केले आहे. हा एक उच्चांक मानला जातो.
उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखाने आणि डिस्टीलरीद्वारे उत्पादन केलेल्या सॅनिटायझरची मागणी राज्यासह देशाच्या विविध राज्यांमध्ये आहे. देशातील अन्य राज्यांनाही पुरवठा केला जाऊ शकतो.
सॅनिटायझरची वाढती मागणी पाहून योगी आदित्यनाथ सरकारने अबकारी आणि ऊस विभागाला इथेनॉल, इथेल अल्कोहोलचा वापर करून सॅनिटायझर उत्पादन पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील कारखाने आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करीत आहेत. उत्तर प्रदेशामध्ये जवळपास ६ लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन केले जात आहे. तर उत्पादन क्षमता ६.५ लाख लिटर आहे. डिस्टिलरी आणि इतर युनीटद्वारे तयार केलेले सॅनिटायझरचा वापर नगरपालिका, आरोग्य विभागासह इतर संस्थंकडून स्वच्छतेसाठी केले जात आहे.