उच्च तापमानामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता कमीच : अन्न सचिव चोपडा

नवी दिल्ली : उच्च तापमानामुळे गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाही, असे केंद्रीय अन्न सचिव संजीव चोपडा यांनी म्हटले आहे. त्यांनी या पिक वर्षात उच्चांकी ११२ मिलियन टन उत्पादन मिळेल असा विश्वास व्यक्त केला. चोपडा यांनी सांगितले की, गव्हाच्या निर्यातीवरील निर्बंध लागू राहतील. त्यामुळे सरकारी खरेदी केलेल्या धान्याची उपलब्धता वाढेल. ते म्हणाले की, सरकार २०२३-२४ या व्यावसायिक वर्षात (एप्रिल-मार्च) जवळपास ३.५ कोटी टन गव्हाची खरेदी करेल.

चोपडा यांनी सांगितले की, गव्हाच्या किमतींमध्ये घसरण झाली आहे आणि नवे पिक आल्यानंतर किमतींमध्ये आणखी घसरण होईल. आम्ही राज्यांतील अन्न सचिवांसोबत एक बैठक घेतली आहे. त्यानंतर राज्यातील अन्न मंत्र्यांसोबतही एक बैठक झाली आहे. आम्हाला बैठकीत जे दिसून आले आहे, त्यानुसार देशातील अन्नधान्याची स्थिती खूप चांगली आहे. ते म्हणाले की, हवामान विभागाने हवामानाच्या स्थितीचे सादरीकरण केले आहे. आणि पुढील दोन आठवड्यांमध्ये गव्हाच्या पिकाला नुकसान पोहोचेल अशा कोणत्याही उष्णतेच्या लाटेची अपेक्षा नाही.

चोपडा यांनी सांगितले की, भारताचे गव्हाच्या उत्पादन पिक वर्ष २०२१-२२ (जुलै-जून) मध्ये गेल्यावर्षीच्या १०९.५९ मिलियन टनापासून घटून १०७.७४ मिलियन टन झाले आहे. काही प्रमुख उत्पादक राज्यांतील उष्णतेची लाट असे याचे कारण आहे. आता हवामानाची कोणतीही प्रतिकूल स्थिती नाही. तापमान सामान्यपेक्षा ३-४ डिग्री सेल्सिअस अधिक आहे. मात्र, वस्तूस्थिती अशी आहे की त्याचा गव्हावर प्रतिकूल परिणाम होणार नाही. सरकारने २०२३-२४ साठी ३४.१ मिलियन टन गहू खरेदीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम (एनएफएसए) आणि इतर कल्याणकारी योजनांसाठी सरकारला प्रती महिना जवळपास १.५ मिलियन टन धान्याची गरज भासते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here