जळगाव : चोपडा साखर कारखान्याने यंदाच्या २०२३ – २४च्या गळीत हंगामासाठी उसाला प्रती टन २,६०० रुपयांचा दर जाहीर केला आहे. खानदेशात हा सर्वाधिक दर आहे, अशी माहिती चोपडा कारखाना भाडेतत्वावर चालवत असलेल्या बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी दिली. सुरुवातीला २,३०० रुपये दर उसाला देण्यात आला होता. परंतु, त्यात ३०० रुपयांची वाढ करण्यात आली असल्याचे गुळवे यांनी सांगितले. गळीत हंगाम संपल्यावर १५० रुपये आणि उर्वरित १५० रुपये हे दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी सांगितले की, कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम १६ फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. ज्या शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक असेल त्यांनी त्वरित कारखाना साईटवर ऊस आणावा. हंगामात फक्त १ लाख ६ हजार टन उसाचे क्रशिंग झाले. कारखाना तोट्यात असूनही अरुणभाई गुजराथी यांच्या आग्रहाखातर तो भाड्याने घेतला आहे. बारामती अॅग्रोचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी गुजराथी यांना दिलेला शब्द पाळला आहे. कारखाना करारानुसार चालत आहे. बारामती ऍग्रोने आतापर्यंत ६० कोटींपेक्षा जास्त खर्च केला आहे. १२ टक्के व्याजदराचा विषय हा नियमाप्रमाणे असून नवीन संचालक मंडळ बारामती अॅग्रोला चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत असे गुळवे यांनी सांगितले.