अमरोहा : ऊस दर जाहीर करण्यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भाकियू्च्या पदाधिकाऱ्यांनी रजबपूरमध्ये महामार्ग रोखला. काही पदाधिकाऱ्यांनी धानोरा तहसीलसमोर आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे पोलिसांची तारांबळ उडाली. महामार्गावर वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या. जवळपास वीस मिनिटे महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला होता. तर धनौरात शेतकरी एक तास रस्त्यावर बसून राहिले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजूत काढल्यानंतर शेतकऱ्यांनी रस्ता मोकळा केला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भारतीय किसान युनियन ओरिजनलच्या पदाधिकारी, शेतकऱ्यांनी ऊस दर जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष चौधरी सुरेंद्र सिंह आणि चौधरी महावीर सिंह यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी अतरासी आणि रजबपूरदरम्यान एकत्र आले. तेथे त्यांनी सरकारविरोधात घोषणा देत महामार्ग रोखून धरला. ही माहिती मिळताच नायब तहसीलदार पोलिसांसह घटनास्थळी आले. त्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली. दरम्यानच्या काळात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. कारखाने सुरू होवून तीन महिने उलटले तरी अद्याप ऊस दर जाहीर झाला नसल्याचे सांगत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. मोकाट जनावरांच्या त्रासापासून शेतीची सुटका करण्याची मागणी केली. यावेळी राजीव, संतराम सिंह, महिपाल सिंह, कपिल, राजवीर सिंह, रघुवीर सिंह, रामकिशन, राजाराम सिंह, जय किरत सिंह, संजीव यादव, राजकुमार, हरपाल सिंह, भगवंत सिंह आदींसह शेतकरी उपस्थित होते.