शिमला : हिंदुस्थान पेट्रोलियमच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशमध्ये २०० कोटी रुपये गुंतवणुकीचा २०० किलो लिटर क्षमतेचा इथेनॉल प्लांट उभारला जाईल असे आश्वासन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले. या इथेनॉल प्लांट मध्ये धान्यापासून इथेनॉल उत्पादन होईल. त्याचा वापर पेट्रोल, डिझेलमध्ये मिश्रण करून वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी होईल. यातून राज्यात पर्यावरण रक्षणाला प्रोत्साहन मिळेल.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी नवी दिल्लीत मंत्री प्रधान यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संकटकाळात हिमाचल प्रदेशला केलेल्या मदतीबाबत केंद्रीय मंत्री प्रधान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले.
मुख्यमंत्री जयराम ठाकूर म्हणाले, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यासाठी १००० डी टाइप ऑक्सिजन सिलिंडर मंजूर केले आहेत. यातील ५०० सिलिंडर आतापर्यंत राज्याला मिळाले आहेत. उर्वरीत ५०० सिलिंडर लवकरच मिळतील. राज्यातील हॉस्पिटल्समध्ये बसवण्यासाठी अर्धा टन क्षमतेचे क्रायोजेनिक ऑक्सिजन टँक आणि कॉर्पोरेट सामाजिक निधीतून ३०० ऑक्सिजन कन्सेंट्रेटर मिळणार आहेत. त्यातून राज्याची ऑक्सिजन क्षमता वाढविण्यास मदत मिळेल. गरज भासली तर बी टाईप ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले जाणार आहेत.
जयराम यांनी संगितले की, केंद्रीय मंत्र्यांनी राज्यात ६० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे स्टेट ऑफ आर्ट मॉडर्न हॉस्पिटल मंजुरीचे आश्वासन दिले आहे. यादरम्यान, राज्यातील इतर मुद्यांवर चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. सी. शर्मा, पंकज शर्मा बैठकीस उपस्थित होते.