हिंगोली : दोन महिन्यांनंतरही उसाचे पैसे मिळाले नसल्याने कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवसांत पैसे मिळाले नाही तर शिवणी कारखान्याच्या कार्यकारी संचालकांच्या दालनासमोर आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या परिसरातील ऊस शेतकऱ्यांनी नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील ट्वेंटी ट्वेंटी कारखान्याला दिला. परंतु दोन महिने लोटले तरी उसाचा एकही पैसा शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळाला नाही. त्यामुळे सण, उत्सवाच्या काळात शेतकऱ्यांना उसनवारी करावी लागत आहे अशी व्यथा शेतकऱ्यांनी मांडली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हा उपाध्यक्ष पराग अडकिने, पंकज अडकिने आदींनी याबाबत साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा व परिसरातील शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली. उसही चांगला झाला आणि तो कारखान्याला पाठवला. परंतु पैसे देण्यासाठी कारखान्याकडे पैसे नाहीत असे सांगितले जाते. ऊस तोडणी सुरू असताना कारखान्याच्या काही प्रतिनिधींनी या भागात येऊन ऊस आमच्या कारखान्याला द्या, आम्ही पैसे देतो, असे सांगितले. कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितल्यामुळे शेतकऱ्यांनी ऊस या कारखान्याला दिला. परंतु दोन महिने झाले तरी अजूनही पैसे मिळाले नाहीत. परिणामी आर्थिक कोंडी झाली आहे.