हिंगोली : विभागातील पूर्णा व टोकाई हे दोन सहकारी साखर कारखाने आणि कोपेश्वर या एका खासगी साखर कारखान्याने गेल्या अडीच महिन्यांत ५,५९,९५० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. हे तिन्ही कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस संपेपर्यंत गाळप करणार आहेत, अशी माहिती कारखाना प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. तिन्ही कारखाना कार्यक्षेत्रात ऊस उत्पादक शेतकरी सभासदांचा जवळपास १२ हजार हेक्टरांवरील ऊस शिल्लक आहे. तर दुसरीकडे यंदा गुळ कारखान्यांनी उसाला २२०० रुपयांपर्यंत दर देत गाळप करणे सुरू केले आहे.
पूर्णा सहकारी साखर कारखान्याने गेल्या ७३ दिवसांत २,५९,९५० मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे. तर कोपेश्वर कारखान्याने ७७ दिवसांत २,५०,००० मेट्रिक टन ऊसगाळप केले. टोकाई कारखाना उशीरा सुरू झाला. या कारखान्याने ५० दिवसांत ८१ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ऊस गाळपाबाबत पूर्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक केशव आकुसकर म्हणाले की, पूर्णा सहकारी साखर कारखान्याने २,५९,९५० मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. कार्यक्षेत्रात ६,५०० हेक्टरांवरील ऊस शिल्लक आहे. ऊस संपेपर्यंत ‘पूर्णा’चे गाळप सुरू राहणार आहे.