हिंगोली : वसमत विभागातील दोन सहकारी व एक खासगी साखर कारखान्याने गेल्या दीड महिन्यांत ३ लाख २१ हजार ५८१ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. पूर्णा सहकारी साखर कारखान्याने ४३ दिवसांत १ लाख ४० हजार ६८० मेट्रिक टन, तर कोपेश्वरने ४७ दिवसांत १ लाख ४९ हजार ७१ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. टोकाई सहकारी साखर कारखान्याने १७ दिवसांपूर्वी गाळपास सुरुवात केली असून, या कारखान्याने ३ जानेवारीपर्यंत ३१ हजार ८३० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. या तिन्ही कारखान्यांनी आतापर्यंत ३ लाख २१ हजार ५८१ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. शिल्लक ऊस पाहता यंदा कारखाने मार्च अखेरपर्यंत गाळप करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तालुक्यातील कुरुंदा, गिरगाव, बोराळा, वसमत, पळसगाव आदी १२ ते १५ गुळ कारखाने गाळप करत आहेत. गुळ कारखान्यानाही गाळपास ऊस देत आहेत. या कारखान्यांनाही गाळपास मुबलक प्रमाणात ऊस मिळत आहे. उसाचे प्रमाण पाहता परजिल्ह्यातील कारखानेही उसासाठी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. ऊस उत्पादकांना वाढीव दराचे आमिषही दाखविण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, तीन कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात सद्यः स्थितीत १८ हजार हेक्टरवरील ऊस शिल्लक असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, पुर्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील दळवी म्हणाले की, पुर्णा कारखाना क्षेत्रात १२ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. कारखाना या सर्व उसाचे गाळप करणार असून, शेतकरी सभासदांनी आपल्याच कारखान्याला ऊस देणे गरजेचे आहे, परजिल्ह्यातील कारखान्यांना ऊस देऊन पैशांसाठी चकरा मारण्याची वेळ येऊ शकते.