वसमत : टोकाई सहकारी साखर कारखाना कार्यकारी संचालकांच्या कक्षात प्रवेश करत यापूर्वीचे अध्यक्ष आम्हाला हप्ता (खंडणी) द्यायचे. तुम्हाला कारखाना चालवायचा असल्यास हप्ता द्यावा लागेल, असे म्हणत कार्यकारी संचालकास खाली पाडून जीते मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यापासून हा कारखाना कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. २० फेब्रुवारी रोजी कोंडबा सटवाजी कदम (रा. वर्ताळा), गंगाधर लोकेवार (रा. कुरुंदा), अरविंद जाधव (रा. सोमठाणा) हे कार्यकारी संचालक प्रल्हाद गायकवाड यांच्या कक्षात घुसले. मागील अध्यक्ष मला हप्ता देत होते, जर कारखाना नीट चालवायचा असेल तर आम्हाला सव्वा लाख रुपये हप्ता (खंडणी) द्यावा लागेल. नाहीतर खतम करून टाकेन, अशी धमकी देत कक्षात गोंधळ घातला. खुर्चा फेकून दिल्या. यावर न थांबता गायकवाड यांना खाली पडले. शिवीगाळ करत टेबलवरील कागदपत्रे फेकून दिली. या प्रकारानंतर संचालक गायकवाड पोलिसांकडे फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध कुरुंदा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.