पुणे : केंद्र सरकारने तत्काळ इथेनॉल उत्पादनास परवानगी देऊन साखर उद्योगास मदतीचा हातभार लावण्याची मागणी साखर वर्तुळातून जोर धरत आहे. इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधांमुळे देशात बी हेवी मळीचा सुमारे आठ लाख टन साठा पडून आहे. साखर कारखान्यांच्या आसवनी प्रकल्पांत शिल्लक मळीच्या साठ्याची किंमत आठशे कोटी रुपये आहे. त्यामुळे केंद्राने तातडीने याचा विचार करावा अशी मागणी केली जातआहे.
‘पुढारी’मध्ये प्रकाशित वृत्तानुसार, मोठ्या प्रमाणावर मळी शिल्लक राहिल्याने दरही टनामागे दीड ते दोन हजार रुपयांनी घटून १० हजार ४०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हंगामाच्या सुरुवातीची शिल्लक साखर आणि साखर निर्यातीवरील बंदी लक्षात घेता किमान १५ ते १८ लाख टन अतिरिक्त साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी होऊ शकतो. शिल्लक मळी साठ्यातून केंद्राने परवानगी दिल्यास देशात सुमारे १७० कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन वाढेल अशी माहिती साखर उद्योगातील सूत्रांनी दिली. याबाबत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी सांगितले की, देशाचे हंगाम अखेरचे साखरेचे अंतिम उत्पादन ३१८ लाख टन होऊ शकते. सध्या देशात १०७ लाख टनांइतके सर्वाधिक साखर उत्पादन तयार करीत महाराष्ट्र अग्रस्थानी असून, ९७ लाख टन उत्पादन घेत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.