सांगली : क्रांती उद्योग समूहाने राबणाऱ्या हातांना नेहमीच बळ दिले आहे. विक्रमी उत्पादन घेतलेल्या ऊस उत्पादकांचा सन्मान म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना दिलेले बळ आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी केले. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याच्या हंगाम २०२२-२३ मध्ये उच्चांकी उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कृषी सहसंचालक तुकाराम मोटे, शास्त्रज्ञ डॉ. सयाजी म्हेत्रे, कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड, उपाध्यक्ष दिगंबर उपस्थित होते. आमदार लाड म्हणाले की, ऊस विकास सुविधांमुळे कमी खर्चात, ऊस पीक शरीरशास्त्र लक्षात घेऊन शेती केल्याने एकरी उत्पादन वाढून आर्थिक सुबत्ता आली आहे. कारखान्याने शेतकऱ्यांच्या बांधावर अद्ययावत तंत्रज्ञान पोहोचवल्याने एकरी उत्पादन वाढले आहे.
यावेळी आडसाली लागण प्रकारात संतोष जाधव (वाझर), अविनाश महिंद (देवराष्ट्रे), आनंदराव पाटील (येळावी) यांचा सत्कार केला. सुरू हंगामातील उत्पादनाबद्दल जितेंद्र जाधव (कुंडल), चंद्रशेखर सावंत (बलवडी) आणि खोडवा प्रकाराबद्दल भीमराव लाड (कुंडल), अशोक पवार (देवराष्ट्रे), अभिजित पवार (कुंडल) यांना रोख बक्षीसे देऊन सहकुटुंब सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास अनिलभाऊ लाड, कारखान्याचे उपाध्यक्ष दिगंबर पाटील, संचालक अश्विनी पाटील, अंजना सूर्यवंशी, कार्यकारी संचालक चंद्रकांत गव्हाणे, अंकुश यादव आदी उपस्थित होते.