नागपूर : राज्यातील ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे स्थलांतर थांबावे, त्यांना शिक्षण घेता यावे यासाठी राज्यातील दहा जिल्ह्यांत ८२ वसतिगृहांची उभारणी केली जाणार आहे. परभणी, धाराशिव, लातूर, नाशिक, जळगाव यांसह सात जिल्ह्यांत २६ जानेवारीपासून वसतिगृहांचे कामकाज सुरू होईल, अशी घोषणा मंत्री गुलाबराव पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत केली आहे. याबाबत सदस्य रमेश कराड यांनी या संदर्भाने प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, ऊसतोड कामगारांच्या पाल्यांकरिता संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना राबविली जात आहे. दहा जिल्ह्यांत ८२ वसतिगृह उभारली जातील. पहिल्या टप्प्यात २० वसतिगृहांना मान्यता देत १७ सुरू झाली आहेत. उर्वरीत वसतिगृहे जागा उपलब्धतेनुसार सुरू होतील. ती २६ जानेवारीपर्यंत व्हावीत असा प्रयत्न आहे. सरकारकडे २,५१,२५३ कामगारांची नोंदणी झाली आहे.