दर जाहीर न करता तुम्ही ऊस कसा काय नेताय..? : शेतकऱ्यांकडून कारखान्याचे अधिकारी धारेवर

कोल्हापूर : तुम्ही ऊसदर जाहीर न करता ऊस कसा काय नेताय…असा प्रश्न विचारून शेतकऱ्यांनी हुपरी येथील जवाहर- आवाडे साखर कारखान्याच्या प्रशासनाला धारेवर धरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सण जवळ आलाय… घरात बाजार भरायला…. मुलांच्या कपडे खरेदीला पैसे नाहीत… अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे. तुम्ही दर जाहीर न करता ऊस कसा काय नेता ? असा सवाल शेतकऱ्यांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना केला. याशिवाय, आमच्या उसातनं तुम्ही बोनस घ्या… आणि आम्ही रिकामचं बसतो… असा टोला लगावला आहे.

गत गळीत हंगामातील उसाला दुसरा हप्ता ४००रूपये व राज्यातील सर्व साखर कारखान्याचे वजनकाटे डिजिटल करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांची २२ दिवसांची ५२२ किलोमीटरची आक्रोश पदयात्रा सुरु आहे. दुसरीकडे आंदोलन अंकुश, रयत क्रांती संघटना, रघुनाथदादा पाटील यांची शेतकरी संघटना यांनी आपापल्या पद्धतीने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा आंदोलनचे केंद्र बनले असून दिवसेंदिवस आंदोलनाची दाहकता वाढू लागली आहे.

दरम्यान, हुपरी येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने अद्याप दर जाहीर केलेला नाही. तरीही उसाची तोडणी चालू करून वाहतूक सुरू आहे. याबाबत माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी ही उस वाहतूक अडवली. ऊस दर जाहीर न करता कारखाना सुरू कसा काय केला..? अशी विचारणा केली. “आमच्या ऊसातनं तुम्ही बोनस घ्या…. आम्ही रिकामेच बसतो. शेतकऱ्याच्या घरात बाजार भरायला पैसे नाहीत…. मुलांना कपडे घेण्यासाठी पैसे नाहीत.. अशी शेतकऱ्यांची परिस्थिती आहे. दर जाहीर न करताच कारखाना ऊस वाहतूक कशी काय करतोय… असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here